लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. नाना पटोलेंमुळे काँग्रेसमधील मरगळ दूर होऊ शकेल, असे बोलले जात आहे.
नाना पटोलेंमधील आत्मविश्वास हा त्यांचा मुख्य गुण आहे. पटोलेंचा वावर खूप आत्मविश्वासपूर्वक असतो. त्याचा कार्यकर्त्यांवर थेट सकारात्मक परिणाम होते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढू शकतो, ज्याची आता काँग्रेसला गरज आहे. थेट बोलण्याचे धाडस हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे. नाना पटोले बोलताना कसलीही भीडभाड बाळगत नाहीत. थेट आणि स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे काँग्रेसमधील उणीवा शोधणे आणि त्यावर मात करणे एका परीने शक्य होणार आहे.
अलीकडच्या काळातील बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे यांच्या तुलनेत पटोले तरूण आहेत. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना अधिक सोपे जाणार आहे. ही पटोलेंच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
नाना पटोलेंचं व्यक्तिमत्व खूप आक्रमक आहे. ते भाजपाचे खासदार असताना त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाला वारंवार प्रश्न विचारले होते. ज्या पक्षात प्रश्न विचारले जात नाहीत, त्या भाजपामध्ये ते खूप आक्रमक होते.
नाना पटोले सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये होते. 2008 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009 ते 2014 या कालावधीत ते विधान परिषदेत भाजपाचे सदस्य होते. 2014मध्ये ते भंडारा-गोंदियामधून भाजपाचे खासदार बनले. पण नंतर भाजपा आणि त्यांच्यात विसंवाद होऊ लागला.
त्यानंतर 2018मध्ये त्यांनी भाजपा सोडली आणि खासदारकीचा राजीनामा दिला. जानेवारी २०१९मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ते साकोलीमधून विजयी झाले. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर ते विधानसभा अध्यक्षपदी निवडले गेले. 4 फेब्रुवारीला त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि 6 फेब्रुवारीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. नाना पटोलेंसह सहा कार्याध्यक्ष आणि दहा उपाध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवी जान टाकण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल.
Comments
Loading…