लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरात येत्या 16 जानेवारीपासून कोरोनाचं लसीकरण सुरू होणार आहे. पण अनेक लोकांमध्ये अजून लसीबद्दल भीती आहे. ही भीती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात आधी लस घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
कोरोनाच्या लसीकरणासाठी संपूर्ण देशासह महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पहिल्यांदाच कोरोनाची लस मिळणार आहे. ती कशी असेल, त्याचे साइड इफेक्ट्स काय असतील, याबद्दल लोकांच्या मनात साशंकता आहे. ही साशंकता दूर करण्यासाठी राज्यकर्त्यांनीच पुढाकार घ्यावा, अशी लोकांची मागणी आहे.
जागतिक नेत्यांचा विचार करता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस, सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लस घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांचाच कित्ता गिरवावा, अशी लोकांची मागणी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी लस घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. 16 तारखेला मोदी लस घेणार की नाही, याबद्दल अजून काहीच स्पष्ट नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात आधी लस घेऊन लोकांच्या मनातली भीती दूर करणार का, याची उत्सुकता आहे.
Comments
0 comments