in ,

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणात चर्चेत असलेले सचिन वाझे नेमके आहेत कोण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानानजीक सापडलेली स्फोटके आणि या प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन यांचा सापडलेला मृतदेह यावरून राज्यात वादळ उठले आहे. याप्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे हे सर्वाधिक चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सचिन वाझे यांची कारकीर्द तशी वादग्रस्त राहिली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या पथकात (क्राइम इंटेलिजन्स युनिट) असताना त्यांचे नाव चर्चेत आले. तेथेच त्यांची देखील ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनच झाली. मुन्ना नेपाली, कृष्णा शेट्टी यांच्यासहीत 63 एन्काऊंटर त्यांनी केले. शिवाय, ‘टेक्नो-सॅव्ही’ अधिकारी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती.

पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात. 2 डिसेंबर 2002 रोजी सायंकाळी मुंबईच्या घाटकोपर रेल्वेस्थानकानजीक एका बेस्ट बसमध्ये स्फोट झाला होता. या प्रकरणात 23 डिसेंबर रोजी ख्वाजा युनूस याला परभणीहून अटक करण्यात आली होती. नंतर त्याला घाटकोपरमध्ये आणण्यात आले. 7 जानेवारी 2003 रोजी वाझे हे इतर पोलिसांसह ख्वाजाला घेऊन चौकशीसाठी परभणीकडे निघाले असताना पारनेर (जि. नगर) येथे तो पळून गेल्याचे सांगण्यात आले.

ख्वाजा युनूसच्या शेजारील कोठडीत डॉ. अब्दुल मतीन होता. त्यांनाही पोलिसांनी याच प्रकरणात अटक केली होती. युनूसला कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो पळून जाऊ शकत नाही, अशी माहिती त्याने न्यायालयाला दिली. तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांची नावेही दिली. त्यानंतर 2004मध्ये वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. तर, 2007मध्ये त्यांनी पोलीस दलाचा दिलेला राजीनामा राज्य सरकारने स्वीकारला नाही. पुढच्याच वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.गेल्या वर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. आता मुंबई क्राइम ब्रांचच्या ‘क्राइम इंटेलिजन्स युनिट’चे ते प्रमुख आहेत.

अर्णब प्रकरणातही सहभाग
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अलीकडेच ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, टीआरपी घोटाळ्याप्रकरणाची चौकशी देखील सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली होत असून त्यातही अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या 10 हजाराच्या पल्ल्याआड

मनसुख हिरेन प्रकरण; पत्नी विमल यांचा ‘तावडे’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख…