लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान बदलामुळे उत्तराखंडमधील घटना ताजी असतानाच, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार आहे.
या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडूला बसणार आहे. या राज्यांमध्ये १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो, असे एका खाजगी हवामान वेबसाइटने सांगितले आहे .
हा अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पर्जन्य नसेल. कारण मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात तापमान एका निश्चित मर्यादेच्या वर गेल्यावर होते. मात्र सध्यातरी अनेक राज्यांमध्ये पारा हा सामान्य तापमानापेक्षा खाली आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या छत्तीसगड तसेच विदर्भाच्या वर एक चक्रिवादळी हवांचे क्षेत्र विकसित होऊ शकते. या माध्यमातून तेलंगाणमधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे देशातील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प देशातील भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.
Comments
Loading…