वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. सकाळी 11 वाजता रुक्मिणी स्वयंवर कथेला सुरुवात झाली. त्यानंतर देवाला पांढरे शुभ्र वस्त्र नेसवण्यात आले. देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली. आजपासून रंगपंचमीपर्यंत देवाला पांढरे वस्त्र आणि गुलाल लावण्यात येतो.
उत्सवमूर्ती सजवल्यानंतर नवरा नवरीचे लग्न मंडपात आगमन झाले. मंदिरातील पुजाऱ्यांनी मंगलाष्टका सुरू केल्या. नवरीचे मामा म्हणून कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कन्यादान केलं. शेवटची मंगलाष्टका झाल्यानंतर अक्षदा आणि गुलालाची उधळण करण्यात आली. लग्नानंतर वऱ्हाडी मंडळींसाठी पंचपक्वान्न भोजनाची सोय करण्यात आली होती.
वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. याच मुहूर्तावर साक्षात श्री पांडुरंग आणि माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. या शाही विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात येते. यंदा देवाच्या गाभाऱ्याला देवांच्या दरबाराप्रमाणे सजावट करण्यात आली. यामध्ये पांढऱ्या शुभ्र सिल्कच्या वस्त्रांमध्ये माता रुक्मिणी आणि भगवान विठ्ठल अधिक खुलले आहेत. भारतीय संस्कृतीत शुभ चिन्ह मानले जाणारे ओम, स्वस्तिक गाभाऱ्याच्या प्रवेश द्वारावर तयार करण्यात आलाय.
तर सभामंडपात फुलांचे व्यासपीठ तयार करण्यात आलाय. या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहत असल्याची अख्यायिका आहे.
Comments
Loading…