पुण्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. वर्षभरात जवळपास 21 लाख पुणेकरांकडून सुमारे 80 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत पोलिसांनी जवळपास साडेआठ कोटी रुपये वसूल केले आहेत.
देशात सर्वाधिक दुचाकी असलेले शहर अशी पुण्याची ओळख आहे. पुण्याची लोकसंख्या 40 लाखांच्या जवळपास पास आहे. वर्षभरात तब्बल 20 लाख 93 हजार 947 केसेस पोलिसांनी दाखल केल्या. यातून तब्बल 80 कोटी 47 लाख 84 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेल्मेट न घालणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, दुचाकीवर तिघांनी स्वार होणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे आदींसाठी प्रामुख्याने कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ 6 लाख 40 हजार 488 पुणेकरांनी दंड भरला आहे. त्यापोटी 18 कोटी 72 लाख 62 हजार 753 एवढी रक्कम जमा झाली आहे. तर, उर्वरित 14 लाख 53 हजार 455 प्रकरणांमध्ये 61 कोटी 75 लाख 21 हजार 700 रुपयाची वसुली अद्याप बाकी आहे.
दंडवसुलीसाठी दुपारी 3 ते 5 या वेळेत पोलिसांनी विशेष नाकाबंदी सुरू केली आहे. पुणेकरांनी वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले असून जनजागृती केली जात आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होतच आहे.
Comments
Loading…