एकेकाळी व्हिक्टोरिया ही मुंबईची शान होती. चौपाटी किंवा मरिन ड्राइव्हवर फेरफटका मारण्यापुरत्या त्या मर्यादित नव्हत्या. दक्षिण मुंबईतील गल्ली-वाड्यांमध्ये त्या फिरायच्या. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्या बंद झाल्या. पण आता त्या पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या आहेत, पण घोड्यांविना.
पेटा तसेच अॅनिमल अॅण्ड बर्ड्स चॅरिटेबल ट्रस्ट यासारख्या संस्थांनी जवळपास सहा वर्षांपूर्वी मुंबईतील घोडागाडी (व्हिक्टोरिया) बंद करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. घोड्यांचे हाल केले जातात. त्यांना पुरेसे खाणे दिले जात नाही. आजारी असतानाही त्यांना गाडीला जुंपले जातात, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्याची दखल घेत या गाड्यांवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी सुमारे 170 व्हिक्टोरिया होत्या.
पण आता मरीन ड्राइव्ह परिसरात घोड्याविना त्या पुन्हा धावू लागल्या आहेत. या इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या आहेत. त्याची बांधणी व्हिक्टोरियासारखीच आहे. मात्र व्हिक्टोरिया चालकाच्या हाती स्टेअरिंग व्हील आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या व्हिक्टोरियांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी 1972 सालच्या ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘व्हिक्टोरिया नंबर 203चा पुढील सिक्वल व्हिक्टोरिया ई – 203’ असे कॅप्शन दिले आहे. गेल्या 24 तासांत दोन हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला असून 183 वेळा रिट्विट करण्यात आला आहे.
Comments
Loading…