लोकशाही न्यूज नेटवर्क | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तिथल्या काँग्रेसमध्ये महाभियोगाचा खटला चालणार आहे. त्यामुळे ट्रम्प व्हाइट हाऊसमधला कार्यकाळ पूर्ण करणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एकापाठोपाठ एक बंद केले करण्यात येत आहेत.
अमेरिकेतील कॅपिटॉल हिलमध्ये समर्थक घुसवून हिंसा घडवण्याचा आरोप असणाऱ्या ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमधील उलटगणती सुरू झाली आहे. ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांनी 25व्या घटनादुरुस्तीचा वापर करायला नकार दिला. त्यामुळे आता ट्रम्प यांना महाभियोगाच्या खटल्याला तोंड द्यावं लागणार आहे.
पण त्याआधीच ट्रम्प यांनी धमकी दिली आहे. आपल्याविरोधात महाभियोग चालला तर लोकांच्या रागाचा स्फोट होईल, असा सूचक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. जो बायडन यांच्या शपथविधीच्या तोंडावर अमेरिकेत हिंसाचाराची शक्यता एफबीआयनेही व्यक्त केली आहे. ट्रम्पसुद्धा तेच सुचवत आहेत.
ट्रम्प यांनी हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून ट्विटर आणि फेसबुकने त्यांचे अकाऊंट कायमचे बंद केले आहे. आता गुगलनेही ट्रम्प यांना दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या यू-ट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ गुगलने काढून टाकला आहे. आता किमान सात दिवस या चॅनलवर नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही.
इतकेच नव्हे तर, ट्रम्प यांच्यापासून उद्योग जगतानेही फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांची सेवा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतली ऑनलाइन पेमेंट सेवा कंपनी स्ट्राईप, ऑफलाइन व्यापार मंच शॉपिफाय आणि निधी जमवणारी कंपनी गोफंडमी य़ा कंपन्यांनी ट्रम्प यांच्यावर बहिष्कार टाकला आहे.
ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमधले अवघे सात दिवस राहिले आहेत. त्यांच्या चार वर्षांचा कार्यकाळ जसा गाजला, त्यापेक्षा जास्त त्यांचे सत्तेतले शेवटचे दिवस गाजत आहेत.
Comments
0 comments