उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे शेतात चारा घ्यायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुली संशयित परिस्थितीत गव्हाच्या शेतात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यापैकी दोन मुलींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. ही घटना उन्नावच्या बबुरहा गावातील आहे. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला असून एकीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुली चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. डॉक्टरांनी विषप्रयोग झाल्याची लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं आहे. आमचा तपास सुरु आहे”.
“तपासासाठी पोलिसांची सहा पथकं तयार करण्यात आली असून प्राथमिकदृष्ट्या मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचं दिसत असून घटनास्थळी काही पुरावेदेखील सापडले असल्याचं.” आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
दरम्यान पोलिसांनी गावकरी आणि पीडित मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली आहे. परिसरात शेती असल्याने कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. दुसरीकडे दलित संघटना आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रुग्णालयात दाखल मुलीला चांगले उपचार मिळावेत यासाठी एम्समध्ये दाखल करावं अशी मागणी केली आहे.
Comments
Loading…