पुणे: दिवसेंदिवस महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकतोय. लॉकडाऊन केल्यानंतर आणि रस्त्यारस्त्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडाही वाढतोय. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १८९५ इतकी झाली आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाने पुण्यात आणखी दोन बळी घेतले आहेत.
या दोन्ही महिला असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. दोघींचं वय अनुक्रमे ५६ आणि ५८ होतं. आणि दोघींना कोरोनासोबतच मधुमेह, हायपरटेन्शनचा आजार होते. त्यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील कोरोना मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तर पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा २६७ झाला आहे. त्यात पुणे शहरातील २२५ रुग्ण आहेत. तर पिंपरी – चिंचवडमधील ३० आणि ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये करोनाचे १३ नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण आधीच्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील असून हे १३ रुग्ण कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आले होते? याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या १३ही जणांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच मालेगावमधील करोना रुग्णांची संख्या २७वर पोहोचली आहे.
Comments
0 comments