in ,

ही तर टाइमपास टोळी; विधानसभा निवडणुकीत साथ देणाऱ्या मनसेवर आदित्य ठाकरेंची टीका

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेत वाक्-युद्ध पेटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला वीरप्पन टोळी म्हणून टीका केली होती. त्यावर सेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत साथ देणाऱ्या मनसेवर टाइमपास टोळी म्हणून उल्लेख करत सणसणीत टोला लगावला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील चेंबूर येथील भक्ती पार्कमध्ये मियावाकी बागेची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मनसेची खिल्ली उडवली. ‘पक्ष आहे की संघटना आहे, हे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपण का लक्ष दिले पाहिजे, ही तर निव्वळ टाइमपास टोळी आहे’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सणसणीत ठाकरी टोला लगावला.

‘देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला कर कमी करावा त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील असा सल्ला दिला होता, याबद्दल पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता, ‘देवेंद्र फडणवीस यांनी जो राज्य सरकारला सल्ला दिला आहे, तो त्यांनी केंद्र सरकारला द्यावा,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

‘मुंबईतील विकासकामांचा मी पाहणी दौरा करत असतो. मानखुर्द फ्लायओव्हरचे काम जून महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मियावाकी जंगलांच्या प्रकल्पात आत्ता 56 हजार झाडे आहेत. याच ठिकाणी 1 लाख झाडे जगवण्याचं उद्दीष्ट आहे’, अशी माहितीही आदित्य ठाकरेंनी दिली.

‘मुंबईत विकासकामं करताना 16 प्लानिंग एजन्सी आहेत. अनेक एजन्सी असल्या की, एक काम करताना अनेक वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यापेक्षा एक एजन्सी असणं गरजेचं आहे’, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दिल्लीची सीमा की चायना बॉर्डर?
‘मी जो दिल्लीच्या सीमेवरचा फोटो बघितला तो बघून मला वाटलं की चायना बॉर्डर आहे का? पण, ही शेतकऱ्यांना अडवण्यासाठीची तयारी होती. जगभरातून किंवा आपल्या देशातून कोणीही ट्वीट केलं तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत का बोलत नाही,’ असा सवाल आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला केला.

विधानसभा निवडणुकीत ‘मनसे साथ’
मुंबईच्या वरळीतून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी मनसेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबद्दलची भूमिकाही स्पष्ट केली होती. राजकारण हे एका बाजूला आणि नातेसंबंध एका बाजूला. त्यामुळे माझ्या कुटुंबातील एक मुलगा पहिल्यांदा निवडणुकीला उभा आहे. तर एक काका म्हणून मी त्या ठिकाणी माझा उमेदवार दिला नाही. मी माझे काम केले. राजकारण यात आणले नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते, हे विशेष!

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कंगनाला ट्विटचा दणका, आक्षेपार्ह ट्विट केले डिलीट

…अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी – नरेंद्र मोदी