in

उल्हासनगरमध्ये होणार राजकीय भूकंप, कारण…

मयुरेश जाधव | उल्हासनगर शहराच्या राजकारणात लवकरच भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल ४ वेळा उल्हासनगरचे आमदार राहिलेले पप्पू कलानी हे राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची नुकतीच घरी जाऊन भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलंय.

उल्हासनगर शहराच्या राजकारणात कलानी या नावाला मोठं महत्त्व आहे. कारण आधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पप्पू कलानी यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि १९९० पासून सलग ४ वेळा आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. यापैकी एकदा काँग्रेस, एकदा आरपीआय, तर दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले. २०१४ साली त्यांच्या पत्नी ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. दरम्यानच्या काळात पप्पू कलानी यांना एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १५ वर्ष तुरुंगात राहून पप्पू कलानी हे सध्या बाहेर आले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांनी शहरात लोकांच्या गाठीभेटी, कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

त्यामुळं कलानी विरोधी गटात अस्वस्थता असतानाच दोन दिवसांपूर्वी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. रात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत हे नेते ‘कलानी महल’मध्ये होते. त्यामुळे पप्पू कलानी हे शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उल्हासनगरमध्ये उधाण आलं. याबाबत कलानी यांचे प्रवक्ते कमलेश निकम यांना विचारलं असता, उल्हासनगर शहराच्या राजकारणाला लवकरच एक नवी दिशा मिळेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. तसंच येणारा महापौर हादेखील टीम ओमी कलानीचाच असेल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पप्पू कलानी हे राजकारणात सक्रिय होऊन शहरात राजकीय भूकंप घडवणार असल्याच्या चर्चा उल्हासनगर शहरात रंगल्या आहेत.

पप्पू कलानी हे जेलमध्ये असताना त्यांचा मुलगा ओमी कलानी याने टीम ओमी कलानी ही राजकीय संघटना स्थापन करत भाजपच्या तिकिटावर शहरात आपले २२ नगरसेवक निवडून आणले. टीम ओमी कलानीच्याच जीवावर कधी नव्हे ते उल्हासनगरात भाजपला महापौरपद मिळालं. तर नंतर पंचम ओमी कलानी या सुद्धा महापौरपदी विराजमान झाल्या. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर टीम ओमी कलानीने भाजपचं समर्थन काढून महाविकास आघाडीला समर्थन दिलं, त्यामुळं आज उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं उल्हासनगरात फार थोडं अस्तित्व शिल्लक आहे. मात्र आता पप्पू कलानी हे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा सक्रिय झाले, तर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी एकहाती सत्ता काबीज करू शकते. त्यामुळं आता पप्पू कलानी हे नेमका काय निर्णय घेतात आणि शहराच्या राजकारणात त्यानंतर काय भूकंप होतो, याकडे उल्हासनगरवासीयांचं लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जल्लोष साजरा करताना फटाके नाही , तर चक्क गोळीबार

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाच बिघडलं गणित