in

मंत्रालयाचे कामकाज होणार दोन शिफ्टमध्ये? मुख्यमंत्र्यांची मुख्य सचिवांना नियोजन करण्याची सूचना

राज्यात गेल्या शुक्रवारपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या वरतीच आहे. हे ध्यानी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर तात्पूरती बंदी घालण्याबरोबरच मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा असे आवाहनही केले होते. आता त्यापाठोपाठ मंत्रालयातील कार्यालयीन वेळाही बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक झाली होती. त्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी, कार्यालयीन वेळच्या बाबतीत पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असे आवाहन केले होते, हे उल्लेखनीय.

याच पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू, ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे. तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल, याबाबत तात्काळ नियोजन करा, अशी सूचना ठाकरे यांनी मुख्य सचिवांना केली.

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, यांची उपस्थिती होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज तिसरा कसोटी सामना

चिटफंड व्यावसायिक आनंद उनवणे खून प्रकरण; दीड वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या कामगाराने केला खून