राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन कमालीचे सतर्क झाले. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापुरातील बंद केलेली कोरोना सेंटर्स पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांप्रमाणे कोल्हापुरातही रुग्णवाढ होऊ शकते. हीच शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने हा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील कोरोना सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोरोना सेंटर्सच्या कामावर देररेख ठेवेल. या कोव्हिड केंद्रांवर जीवनरक्षक प्रणालीसह (व्हेंटिलेटर्स) इतर आवश्यक सुविधांची सोय करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
10 मंगल कार्यालयांवर धडक कारवाई
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दीच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 12 मंगल कार्यालये आणि समारंभ आयोजकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. या माध्यमातून पालिकेने आतापर्यंत 34 लाखांचा दंड वसूल केला आहे.
मंगल कार्यालयांची तपासणी करण्यासाठी पालिकेकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून रविवारी जिल्ह्यातील 27 मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे.
तसेच नागरिकांना तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे. मार्च 2021 पासून सहआजार (को-मॉर्बिडिटी) असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल. त्यासाठी आगामी काळात उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य उपकेंद्रे यांनी १ मार्चपासून लसीकरणाची आणखी व्यापक व्यवस्था करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.
Comments
Loading…