कोरोना विषाणूचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला. या विषाणूने आर्थिक त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यावर देखील परिणाम केला आहे. कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना मागील वर्षभरात घडल्याचे पाहायला मिळाले. एका अहवालानुसार पुण्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातूनही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामधून बरे झाल्याल्याआईला घरात घेण्यास मुलाने आणि सुनेने नकार दिला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत महिलेला घरात प्रवेश मिळवून दिला.
पुण्यामधील नरे परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या महिलेवर सिंहगड रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनातून बरे झाल्यानंतर या महिलेला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देत असताना त्यांनी मुलाला फोन करून तुमची आई बरी झाली असून तिला घेऊन जा, असे सांगितले. यावर मुलाने मात्र तिला तिकडेच कुठेतरी ठेवा, घरी पाठवू नका असे धक्कादायक उत्तर दिले. या घटनेनंतर डॉक्टरांनी सिंहगड पोलिसांशी संपर्क साधून हा संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घातला.
सिंहगड पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आणि संबंधित महिला रुग्णवाहिकेतून घरी गेले असता घराला कुलूप असल्याचे दिसले. यावेळी पोलिसांनी पुन्हा एकदा या मुलाला संपर्क साधला असता आम्ही बाहेर आलो असून आम्हाला येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पोलिसांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पोलीस कर्मचारी या महिलेच्या घरी गेले असता मुलगा आणि सून दोघेही घरी होते. पोलिसांनी दोघांनाही सिंहगड पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून त्यांचे समुपदेशन केले त्यानंतर या दोघांनीही कसलेही आढेवेढे न घेता आईला घरी नेले.
Comments
Loading…