in

‘भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून परप्रांतीयांच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमीपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले,’ अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

‘नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत. ‘मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठय़ा वसाहती आहेत. माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत. शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो व त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. मुंबई तर बऱ्याच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढय़ानपिढय़ा मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?,’ अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

‘मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही,’ असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात 3 हजार 391 नवीन कोरोनाबाधित आढळले

‘…म्हणून म्हणालो होतो मला माजी मंत्री म्हणू नका’