लोकशाही न्यूज नेटवर्क
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावरून सध्या राज्यात जोरदार वातावरण तापलं आहे. राजमाता अहिल्यादेवींसारख्या महान व्यक्तिमत्त्वांना जातीजातींमध्ये विभागले जात आहे, हे दुर्देवी आहे. बहुजनांना एकाच छत्राखाली आणून जातीयवाद नष्ट करण्याची गरज आहे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.
मार्तंडदेव संस्थानच्या वतीनं जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. गडाच्या पायथ्याजवळील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणंही करण्यात आलं आहे. इथं लोकार्पणप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे आणि होळकर संस्थानचे युवराज यशवंतराजे हे उपस्थित होते.
अहिल्याबाई आजच्या पिढीच्या स्त्री शक्तीच्या प्रतीक आहेत. त्यांनी सत्तेचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यांच्या आदर्शानुसार आपण महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे, असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.
पडळकरांनी आधीच केलं अनावरण –
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं शुक्रवारीच अनावरण केलं. शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुतळ्याचं अनावरण केलं. यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं. शरद पवारांच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी आमची भूमिका असल्यामुळे आम्ही आधीच अनावरण करून घेतलं, असं पडळकर म्हणाले. दरम्यान, देवस्थाननं मात्र पडळकर यांच्या या कृतीचा निषेध केला. शनिवारी शरद पवार, खासदार संभाजीराजे आणि होळकर संस्थानचे युवराज यशवंतराजे यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Comments
Loading…