लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, महापालिका यासाठी ५.५० कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, या प्रकल्पात एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार आहे. मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा नियमितपणे व्हावा, यासाठी गेले काही वर्ष नव्या स्रोताबाबत विचार केला जात होता. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी वरदानच ठरणार आहे.
या प्रकल्पामध्ये समुद्राचे सुमारे २०० दशलक्ष लीटर पाण्याचे शुद्ध केले जाणार आहे. या प्रकल्पाचा मसुदा आणि निविदा यांसाठी महापालिकेकडून ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सल्लागार कंपनीने ८ महिन्यात या प्रकल्पाचा अहवाल तयार करून द्यायचा असून ३० महिन्यात प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते गोड पाणी मुंबईकरांना पुरवण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर आला होता. मात्र हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगून तो स्वीकारला गेला नाही. यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समुद्राचे पाणी गोड करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजी या कंपनीची निवड करण्यात आली असून, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल या कंपनीकडून देण्यात येणार आहे.
Comments
Loading…