पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होती. भाजपाने तर याप्रकरणात थेट नाव घेऊन सखोल चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत 15 दिवसांनी आपले मौन सोडत संजय राठोड यांनी, हा आपल्याला बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
पुण्यामध्ये 6 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. यामध्ये संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. तथापि, तेव्हापासून ते ‘नॉट रिचेबल’ होते. मात्र आज (23 फेब्रुवारी) संजय राठोड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. हे अतिशय चुकीचे आहे. माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
मी गेल्या 30 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. दहा दिवसांपासून अलिप्त होतो. पण माझे काम थांबलेले नव्हते. माझी शासकीय कामे सुरू होती. मुंबईतील फ्लॅटवरून ही कामे मी करीत होतो. माझे काम पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार आहे, असे सांगत त्यांनी राजीनाम्याबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
पूजाच्या मृत्यूबद्दल दु:ख
पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख आहे. तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. तथापि, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून जे दाखण्यात आले आहे, त्यात तथ्य नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी सुरु केली आहे, त्यात सर्व स्पष्ट होईल, असा दावा संजय राठोड यांनी केला.
Comments
Loading…