मुंबईतील भांडुप येथील ड्रीम्स मॉल मधील सनराईज हॉस्पिटलला गुरुवारी रात्री आग लागली. या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची तत्काळ मदत जाहीर केली. मात्र या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नेते संजय दिना पाटील यांनी केली आहे.
तर, मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
नक्की काय चुकलं?
ठिकठिकाणी आगीच्या घटना उघडकीस आल्यानंतर इमारतींचे फायर ऑडिट करण्यात येते. भंडारा या ठिकाणी देखील रुग्णालयात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र, आधीच रुग्णालयांचे फायर ऑडीट का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. परवानगी देतान रुग्णालयाने अपातकालीन व्यवस्थनाची नीट व्यवस्था केली आहे, की नाही हे आधीच का पाहिलं जात नाही. या दुर्घटनेतील सर्वात मोठी चूक म्हणजे फायर एक्झिटचा रस्ताच बंद होता. त्यामुळे आग लागल्यानंतर काहींना रस्ता सापडला नाही.
सनराईज रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध करत मृत्यू कोरोनामुळे झाले असून आगीचा त्यांच्याशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचंही रुग्णालयाने सांगितलं आहे. आग लागल्यानंतर सुरुवातीला दोन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच काहीजण अडकल्याची भीती होती. पण अखेर ही मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने सुरुवातील खोटी माहिती का दिली? असाही सवाल आता उपस्थित होत आहे.
Comments
Loading…