कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावी परीक्षांचे काय होणार याचा निकाल लांबणीवर गेला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याचे विभागाच्या वतीने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
कोरोनामुळे राज्यभर लागलेले निर्बंध लक्षात घेता परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार सुरू असून यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून मिळाली. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबत उद्या बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. कारण या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विविध मार्ग खुले होतात. आजच्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागलेल्या नव्या नियमांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांविषयी पेच निर्माण झाला होता.
त्यामुळे मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा आयोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत दहावी-बारावी परीक्षेबाबत अद्याप चर्चा बाकी असल्याचे सांगण्यात आले, तर नववी आणि अकरावीचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
Comments
Loading…