लोकशाही न्यूज नेटवर्क
बलात्काराच्या आरोपामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा हेगडे यांनी मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्मानं माझ्याशी संपर्क साधून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हेगडे यांनी केला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मनिष धुरी यांनीदेखील रेणू शर्मावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर कृष्णा हेगडेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसेच्या मनिष धुरी यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचा दावा केला. ‘कृष्णा हेगडेंना मी फोन केला होता. कारण २००८-०९ मध्ये माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता. रेणू शर्मानं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता,’ असं धुरी यांनी सांगितलं.
रेणू शर्मानं माझ्याशी संपर्क साधला होता. ती मला फॉलो करत होती. त्यावेळी मी मनसेचा विभाग अध्यक्ष होतो. तिनं माझ्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न केले. तिला व्हिडीओ अल्बम काढायचा होता. त्यासाठी तिच्याकडून ब्लॅकमेलिंग सुरू होतं. तिचा हेतू लक्षात आल्यावर मी पिच्छा सोडवून घेतला. अन्यथा त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता,’ असा दावा धुरी यांनी केला. तुम्ही त्यावेळी रेणू शर्माविरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्न धुरी यांना विचारण्यात आला.
‘महिलेची बदनामी नको म्हणून त्यावेळी मी शांत बसलो. मी त्या महिलेपासून पिच्छा सोडवला होता. त्यामुळे मी शांत राहिलो. पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर मग तिचा आणि माझा संपर्क आला नाही. कदाचित त्यावेळी ती कृष्णा हेगडे किंवा इतर नेत्यांच्या संपर्कात असावी. २०१८-१९ मध्ये तिनं माझ्याशी संपर्क साधला. पण तिचा हेतू माहीत असल्यानं मी तिला टाळलं,’ असं धुरींनी सांगितलं.