लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा पुढे आला आहे. विशेष म्हणजे, सीएमओ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच हे नामांतर करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आली. त्यात उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘धाराशिव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे’, असे एका निर्णयात म्हटले आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा वाद रंगला आहे. काँग्रेसचा या नामांतराला तीव्र विरोध आहे. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर औरंगाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) ट्विटरवरून देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. तथापि, ‘टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे सीएमओचे ट्विटर हॅण्डल पाहणाऱ्याला समज देऊ’, असे मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
पण यावेळी सीएमओ ट्विटर हॅण्डलवर उस्मानाबादचेही नामांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा टाइपिंगची चूक आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातही संभाजीनगर आणि धाराशिव असा उल्लेख काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याशी संबंधित निर्णयांमध्येच करण्यात आला, हे विशेष!
Comments
0 comments