कुख्यात गुंड रवी पुजारीला बंगळुरू कोर्टाकडून ताबा घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. २३ फेब्रुवारी रोजी त्याला मुंबईतील किल्ला कोर्टात हजर केलं जाणार आहे. खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पाच वर्षांपासून मुंबईतल्या विलेपार्लेत खंडणीसाठी रवी पुजारीनं एकाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात रवी पुजारीवर गुन्हाही दाखल झाला होता. मुंबईत रवी पुजारीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले आहेत.
2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
कोण आहे रवी पुजारी
1990 पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून काम करत होता. सुरुवातीला गँगस्टर छोटा राजन याच्या टोळीत असलेल्या पुजारीने नंतर स्वतःची टोळी बनविली. तो मूळचा कर्नाटकातील मालपे येथील रहिवासी आहे . मुंबईत येऊन त्याने विविध व्यावसायिकावर, बॉलिवूड, बिल्डर यांच्याकडे खंडणी गोळा करू लागला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यामध्ये तो मुख्य आरोपी आहे.
Comments
Loading…