in

Rain Update | राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा कहर !

Share

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्टय़ामुळे या आठवडय़ात परतीच्या पाऊसकाळात अतिवृष्टी पाहायला मिळाली. एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात प्रवास करणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची ही अतिदुर्मीळ घटना देशातील हवामान शास्त्राने पहिल्यांदाच अनुभवली. येत्या सोमवारी (१९ ऑक्टोबर) पुन्हा बंगालच्या उपसागरात तशाच प्रकारचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवडय़ात पुन्हा परतीच्या पावसाचा कहर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून नोंदविण्यात आली आहे.

परतीच्या पावसाऐवजी आलेल्या जलकहरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांतील शेतीचे अतोनात नुकसान झाले आणि सुमारे ४७ नागरिकांचे बळी गेले. सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र या पट्टय़ाची तीव्रता किंवा त्याची वादळात निर्मिती होणे आणि प्रवासाचा वेग, दिशा यावरच त्याचा राज्यावरील परिणाम ठरणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दक्षिण गुजरातमधील हा पट्टा ४८ तासांत ओमानकडे सरकणार आहे. त्यामुळे त्याची आता चिंता नसली, तरी नव्याने निर्माण होणाऱ्या पट्टय़ाकडे लक्ष केंद्रित झाले आहे. त्या पट्टय़ामुळे १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार, तर २० ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पट्टय़ाची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्रावरील परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

परतीचा पाऊस थांबलेलाच
देशामध्ये मोसमी पावसाने २८ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली, तरी तो थांबलेलाच आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास १० दिवसांहून अधिक काळ स्थिर आहे. नियोजित आणि अंदाजित वेळेनुसार १० ऑक्टोबरला राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी पाऊस परतणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही त्याचा राज्यातील परतीचा प्रवास सुरू झालेला नाही.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कंगनाविरोधात FIR दाखल करा, वांद्रे कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

Weather Alert: पुढील 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा