in

पुणे पोलिसांचे नगरमध्ये छापे, नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांची धरपकड

कर्ज प्रकरणात नगर अर्बन बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचाही शोध सुरू आहे.

कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवडगाव येथील नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या शाखेत हा प्रकार घडला.

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. सध्या बँकेचे संचालकमंडळ बरखास्त करण्यात आलेले असून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंत्र्यांनी केली चूक; मुख्यमंत्र्यांवर सारवासारव करण्याची नामुष्की

Ind Vs. Eng : भारताचा सर्व बाद 365 धावा, वॉशिंग्टन सुंदरचे शतक हुकले