मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुंबई पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेल्या बदलीला त्यांनी आव्हान दिले आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही चूक असल्याचे मानून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यानंतर परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत १०० कोटी रुपये पैसे वसुलीचा आरोप केला. त्यानंतर आपल्या बदलीच्या आदेशाला आव्हान देत परमबीर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.
या याचिकेवर सुनावणी घेण्यास बुधवारी सुप्रीम कोर्टाने नकार दिला व परमबीर यांना प्रथम मुंबई हायकोर्टात जाण्याची सूचना केली.सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसारच परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून केलेल्या बदलीला परमबीर यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही परमबीर यांनी आपल्या याचिकेत केली आहे
Comments
Loading…