पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ असून डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महागाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी नेटिझन्स सक्रिय नसतील तर, नवलच! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून सोशल मीडियावर जोरदार पोस्ट पडत आहेत.
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. नव्या कायद्यानुसार शेतकरी आपला कृषीमाल कुठेही विकू शकतो. हाच धागा पकडत एका नेटिझन्सने ट्विट केले आहे. ‘पेट्रोलचे दर वाढल्याने एवढा हाहाकार कशासाठी? तुम्ही पेट्रोल कुठेही जाऊन भरू शकता. मुंबईत जास्त दर असेल तर, मिझोराममध्ये जाऊन पेट्रोल भरा,’ असे ट्विट त्याने केले आहे.
एकाने थेट आयपीएलच्या लिलावाशी या इंधन दरवाढीची तुलना केली आहे. सर्वाधिक बोली इंधनावर लागली असल्याचे कार्टून त्याने पोस्ट केले आहे. तर, पेट्रोल पंपावरच्या मशिनलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याने दरवाढीची कोणी तक्रार न करता, त्यांच्या या फोटोलाच ग्राहक नमस्कार करत असल्याचे कार्टून दुसऱ्या एका नेटिझन्सने पोस्ट केले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढत होत असून त्यावर एकाने ट्विट केले आहे. मित्रांनो, तुम्ही आजच टँक फूल्ल करा, उद्या बघा तुमचे किती पैसे वाचतात ते, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असल्याचे ट्विट त्याने केले आहे.
डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना इंधन दरवाढीवर ट्विट करणारे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी सध्याच्या इंधन दरवाढीवर ट्विट केलेले नाही, यावर काँग्रेसने टीका केली आहे. याच मुद्यावरून हे भीतीचे वातावरण कशासाठी, असा सवाल एकाने केला आहे.
Comments
Loading…