कोरोना महामारीत सरकारीसह खाजगी डॉक्टर अतोनात एखाद्या योद्ध्याप्रमाणे सेवा देत आहेत. मात्र ही सेवा देत असताना त्यांच्यासोबत सरकार दुजाभाव करतय, त्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधा सरकार देत नसल्याचा आरोप खाजगी डॉक्टर करत आहेत. या समस्या डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मांडल्यानंतर, आता मनसेने सरकारला पत्र लिहून इशाराच दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात काय लिहलय ?
खासगी डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी मला भेटून सरकारी अनास्था सांगितली, कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरुच ठेवली. यादरम्यान सरकारने कोव्हिड योद्धे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी मग ते सरकारी असो की खासगी या सर्वांना 50 लाखाचं विमाकवच देण्याचं परिपत्रक काढलं. मात्र आता खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून नाकारलं जात असल्याचं कारण दिलं जातेय.
विशेष म्हणजे हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना, राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रातून विचारला आहे. तसेच सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून खासगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा, असं राज ठाकरे म्हणाले.
Comments
0 comments