मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णवेळ सुरु करण्यात आलेली नसली तरी, प्रवाशांची संख्या वाढत आहे. अशावेळी कोरोनापासून बचावासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गांवर प्रत्येकी 100 मार्शल्स नेमण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षीततेसाठी लोकलमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर वारंवार सूचनांची उद्घोषणा केली जाते. पण त्याकडे प्रवासी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. बेशिस्त प्रवाशांची संख्याही वाढली आहे. रेल्वे स्थानंकांवर जसजशी गर्दी वाढू लागली आहे तसतशी गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या तब्बल 2 हजार 558 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत पालिका आणि रेल्वे प्रशासनानं 3 लाख 28 हजार 500 इतका दंड वसूल केला आहे.
जानेवारीच्या अखेरपर्यंत आटोक्यात आलेली रुग्ण संख्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला लोकल सुरू झाल्यानंतर वाढू लागल्याचे निरक्षण आहे. त्यामुळे पालिकेनं आणि रेल्वे प्रशासनानं अधिक तीव्र कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या आणि सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांवर स्पेशल मार्शल्सची नजर राहणार आहे. यामुळे लोकलमध्ये कोरोना नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांना चाप बसेल आणि रुग्ण वाढीच्या संख्येला ब्रेक लागेल, आणि मुंबई कोरोनातून मुक्त होईल असं पालिकेचं ध्येय आहे.
Comments
Loading…