लोकशाही न्यूज नेटवर्क
गुरुवारी मकर संक्रांत… तिळगूळ घ्या आणि गोड बोला अशा शुभेच्छा मकर संक्रातीला दिल्या जातात… पण मकर संक्रांतीला तिळगुळाला एक विशेष महत्त्व आहे. त्याला एक वैज्ञानिक बैठक आहे.
मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. दिवस मोठा तर रात्री छोटी असते. हिंदू संस्कृतीत सूर्याचे उत्तरायण शुभ मानले जाते. या दिवशी एखादे पुण्याचे काम केले किंवा आरोग्यात गुंतवणूक केली तर, त्याचं फळ शंभर पट जास्त मिळते, अशी धारणा आहे. या दिवसाचे महत्त्व इतके आहे की, देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. गोवा, ओडिशा, हरियाणा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि जम्मूत याला मकर संक्रांती म्हणतात. तर तामिळनाडूत तो पोंगल नावाने साजरा केला जातो.
या दिवशी काही ठिकाणी भात आणि उडीद डाळीची खिचडी खाल्ली जाते. काही भागांत याला खिचडी पर्वसुद्धा म्हणतात. डाळखिचडी आरोग्यासाठीही उत्तम असते. संक्रांतीला तीळ खाण्याबद्दल पुराणात उल्लेख सापडतात. भागवत पुराणानुसार शनिदेव आणि सूर्यदेवाचे भांडण मिटल्यानंतर शनीने सूर्याला तिळाचे भोजन दिले आणि शनीला त्याचे वैभव परत मिळाले. ही झाली पुराणातील मान्यता. पण खिचडी आणि तीळगूळ खाणे आरोग्यासाठीही खूप फायद्याचे आहे.
या दिवसांत देशातील बहुतांश भागात थंडी असते. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याने ऋतुबदल होतो. ऋतुबदलामुळे आजारी पडण्याची भीती असते. तीळ आणि डाळखिचडीत पोषकतत्त्वे असतात. ज्यातून शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पतंगांनी भरते आकाश
या दिवशी पतंग उडवणे म्हणजे अबालवृद्धांसाठी एक पर्वणीच असते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीराला फायदा होतो, असे सांगितले जाते. थंडीमध्ये त्वचा रुक्ष होते आणि अनेकांना त्वचारोगाचा त्रासही जाणवू लागतो. परिणामी त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात, या किरणांमधून शरीराला आवश्यक व्हिटामीन डी मिळते. म्हणूनच पंतग उडवण्याची प्रथा सुरू झाली, असे मानले जाते.
त्यामुळेच देशभरात मकर संक्राती वेगवेगळ्या नावाने साजरी केली जात असली तरी त्यात आरोग्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मकरसंक्रांतीच्या तुम्हालाही शुभेच्छा… तिळगूळ घ्या आणि गोड बोला…
Comments
0 comments