in

मकर संक्रांती दिवशी सवाष्ण स्त्रिया का पूजतात सुगड? जाणून घ्या पूजा विधी

Share

सुवासिनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय अधुरी आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्व आहे. ‘सुघट’ म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात ‘सुगड’ असा झाला. शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते. त्यानुसार सुवासिनी महिला देखील या दिवशी सकाळी स्नान करुन देवापुढे अशा सुगडाची पूजा करतात. यंदा 14 जानेवारीला या सुगडाची पूजा केली जाईल. नवविवाहित महिलांसाठी सुगडाची पूजा हे थोडं नवीनच विषय असतो. त्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहितीची गरज असते.

सर्वात आधी जाणून घेऊया सुगडासाठी लागणारे साहित्य….

सुगडासाठी तुम्हाला मोठे काळे सुगड आणि त्याहून छोटे लाल सुगड लागेल. त्याबरोबरच हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे साहित्या लागेल. तसेच पूजेसाठी पाट वा चौरंग, लाल रंगाचा फडका, हळदी-कुंकू, दिवा, रांगोळी, तांदूळ, फुले, तिळगूळ-लाडू या गोष्टी लागतील.

सुगडाची पूजा कशी करावी?

1. सुगड पूजनासाठी पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडा. त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू लावून पाट किंवा चौरंग मांडा.

2. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य 2 सुगडामध्ये ठेवा. काही ठिकाणी 5 सुगडांचंदेखील पूजन केलं जातंं.

3. सुगडांवर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा.

4. पाट/चौरंगावर लाल वस्त्र ठेवा. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर भरलेलं सुगडं मांडा. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगड मांडून ठेवा.

5. त्यानंतर दिवा लावा. सुगडावर हळद कुंकू वाहा. अक्षता फुलं वाहून नमस्कार करा.

6. तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा.

अशा पद्धतीने सवाष्ण स्त्रिया सुगडाची पूजा करु शकतात. या दिवशी अनेक स्त्रिया घरात हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम देखील करतात. त्यावेळी सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद-कुंकू लावून तिळगूळ लाडू आणि वाण दिले जाते. हा हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम तुम्ही रथसप्तमी पर्यंत कधीही करु शकता. मात्र सुगड हे मकर संक्रांतीच्या दिवशीच पूजायचे असते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

MPSC EXAM:राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ‘या’ तारखेला होणार

धक्कादायक ! घटनेची माहिती देणारा आणि घटनास्थळी उपस्थित असलेला निघाला खुनी