लोकशाही न्यूज नेटवर्क
गरजू लोकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये “माँ कँटीन” ही योजना सुरू केली आहे. सुरूवातीला कोलकत्त्यामध्ये १६ ठिकाणी ही योजना राबवली जाईल, जिथे कमीतकमी एक हजारापेक्षा जास्त लोकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.
“जसं आपली आई, माँ किंवा अम्मा घरामध्ये प्रत्येकाला प्रेमाने जेवण देते तसेच माँ योजनेमध्ये गरजूंना जेवण दिले जाईल. या थाळीमध्ये डाळ, भात, भाजी आणि अंड्याचा रस्सा हे पदार्थ दिले जातील, राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी १०० करोड रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकांना फक्त पाच रूपये द्यावे लागतील आणि उरलेल्या १५ रूपयांचे अनुदान राज्यशासन देईल. लवकरच सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये दुपारी १ ते ३ च्या दरम्यान कँटीन सुरू होतील”,अशी माहिती मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिली.
तामिळनाडुच्या तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांनी असेच अम्मा कँटीन सुरू केले होते, जिथे पाच रूपयांमध्ये गरीबांना पोटभर जेवण दिले जात होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात शिवथाळी हा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर बॅनर्जी यांची ही योजना आणल्याचे समजते. परंतु विरोधकांच्या मते हा निवडणुकीसाठी करण्यात आलेला राजकीय स्टंट आहे.
Comments
Loading…