लोकशाही न्यूज नेटवर्क
पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदी चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे आपल्या जवानांना मरण्यासाठी सोडून दिले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. पुलवामा येथे हल्ला होणार याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती, असे असतानाही पंतप्रधान मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. गुप्त माहितीवर वेळीच कारवाई करायला हवी होती, त्याकडे डोळेझाक का करण्यात आले, अशी विचारणा राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काँग्रेसने संरक्षण बजेटवरून मोदी सरकारची जोरदार टीका केली होती. भारतीय सैन्य दोन आघाड्यांवर लढत आहे. एकीकडे पाकिस्तान, तर दुसरीकडे चीनचे मोठे आव्हान देशासमोर आहे. अशा परिस्थितीत संरक्षण बजेट कमी करून मोदी सरकारने जवानांचे मनोधैर्य कमकुवत केले आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आली.
दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलावामा येथे CRPF जवानांच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवानांना हौतात्म्य आले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. याच दिवशी पंतप्रधान मोदी डिस्कव्हरी वाहिनीसाठी बियर ग्रिल्स यांच्यासोबत भारतीय जंगलात चित्रिकरण करत होते. यावरूनही विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली होती.
Comments
Loading…