लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून कारागृहात असलेला संशोधक रोना विल्सन याच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह मजकूर पेरला गेला असल्याचा ‘आर्सेनल कन्सल्टिंग’ कंपनीचा अहवाल स्वतंत्र नाही. आरोपी विल्सननेच या खासगी कंपनीला या कामासाठी नेमले होते, असे खुद्द कंपनीच्या अहवालातच नमूद आहे. त्यामुळे केंद्राच्या तपास यंत्रणेने हा अहवाल नाकारला आहे’, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ कंपनी आर्सेनल कन्सल्टिंगने विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये घातक सॉफ्टवेअरचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर असलेली कागदपत्रे पेरण्यात आल्याचा दावा केला आहे. त्याबाबत विचारणा केली असता, फडणवीस यांनी या कंपनीच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘हा अहवाल वाचला असून, पहिल्या परिच्छेदातच ‘या कामासाठी रोना विल्सनने नेमणूक केली आहे,’ असे म्हटले आहे. त्यामुळे हा अहवाल स्वतंत्र कंपनीने दिलेला नाही. स्वत: आरोपीने या खासगी कंपनीला नेमले आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल केंद्राच्या तपास यंत्रणेने नाकारला आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
Comments
Loading…