राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच एक चिंताजनक गोष्ट पुढे येत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेऊनही त्यांना पुन्हा संसर्ग झाला आहे . त्यामुळे लस बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोरोनाचा संसर्ग थोड्याप्रमाणात कमी झाल्यानंतर राज्यात सर्वत्र पुनश्च हरी ओम म्हणत नियम अटी लावून अनेक गोष्टी अनलॉक करण्यात आल्या होत्या. परंतु नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
“मागील काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत आहेत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. परंतु, माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे ‘नो मास्क,नो एन्ट्री’ आवश्यक आहे. मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत” अशी माहिती कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी अकारण घराबाहेर न पडता प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे आढळून आली तरी ती अंगावर न काढता तातडीने चाचणी करावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
Comments
Loading…