लोकशाही न्यूज नेटवर्क
चेन्नईत सुरू असलेल्या इंग्लंड विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला निर्णायक आघाडी मिळाली आहे. फिरकीपटू आर अश्विनच्या पाच बळींच्या जोरावर भारताने पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवर रोखण्यात यश आलं आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्माच्या १६१ धावांच्या जोरावर भारताने ही धावसंख्या गाठली. यानंतर दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा संघ तंबूत परतला. यामुळे पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली आहे.
सलामीवीर रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. पाठोपाठ डॉम सिबली (१६) आणि डॅन लॉरेन्स (९) दोघांना अश्विनने बाद केले. अक्षर पटेलने तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही.
मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.
Comments
Loading…