पाकिस्तानात आपली सत्ता शाबूत राखण्यात पंतप्रधान इम्रान खान यांना यश आले आहे. सिनेट निवडणुकीनंतर इम्रान खान सरकार पाकिस्तानी संसदेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले होते. याद्वारे विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याचे इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफने (पीटीआय) म्हटले आहे.
पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या वरिष्ठ सभागृहाच्या (सिनेट) निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआयला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर, माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. युसूफ रझा गिलानी यांनी इस्लमाबादमधून विजय मिळवला आहे. गिलानी यांचा हा विजय इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआय पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांनी पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख यांना पराभूत केले होते.
इम्रान खान सरकारला बसलेल्या या झटक्यामुळे विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संसदेचं कनिष्ठ सभागृहात एकूण 342 सदस्य आहेत. त्यापैकी इम्रान खान यांच्या पीटीआयचे 156 सदस्य आहेत. हा ठराव जिंकण्यासाठी इम्रान खान सरकारला 172 मतांची आवश्यकता होती. मतदानाच्या वेळी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटसह एकूण 11 विरोधी पक्षांनी सभात्याग केला. त्यानंतर इम्रान खान यांना 178 मते मिळाली.
Comments
Loading…