परमबीर सिंह प्रकरणावरून काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सरकारमध्ये असतो तर, परमबीर सिंह यांना निलंबित केले असते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सचिन वाझे आणि परमबीर सिंह प्रकरणांवरून भाजपाने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर काल (23 मार्च) काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. त्यावेळी आम्ही केवळ चर्चा केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली होती.
तर, आज (24 मार्च) नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईसारख्या अतिसंवेदनशील शहराचे परमबीर सिंह पोलीस आयुक्त होते. त्यांना परिस्थिती सांभाळत येत नाही, मग असे अधिकारी कशाला हवेत? मी सरकारमध्ये असतो तर, बदली केली नसती थेट निलंबित केले असते.
काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असून सरकारच्या आर्थिक देवाण-घेवाणीत काँग्रेसचा हिस्सा किती, हे सांगण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर पटोले म्हणाले, या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून देश चालवणारी लोक काँग्रेसला वाट्याचे सांगत आहेत. वाटा आणि घाटा हा फडणवीस सरकारने केला. त्यांनी मंत्रालयात किती संघाची लोक लावली याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत.
Comments
Loading…