in

‘माझ्याही ज्ञानात भर पडली’; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा टोला

दुसऱ्या मताचा अनादर केला जात नाही, पण मुस्लिमांच्या नाही, तर भारताच्या वर्चस्वाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे परखड मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी मुंबई येथे मांडले होते. तसेच सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मोहन भागवत काल म्हणाले की या देशातले हिंदू आणि मुस्लीम एकच समजतो याचा अर्थ नेमका काय घ्यायचा असा सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावेळी “त्यांनी आता एक नविनच गोष्ट सांगितली की दोन्ही समाजांचा मूळ जन्म हा एकाच कुटुंबातून झाला आहे. माझ्याही ज्ञानात भर पडली ते वाचून,” असे शरद पवार यांनी म्हटले. सोमवारी ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशन’तर्फे मुंबईत ‘राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वतोपरी’ परिषदेत सरसंघचालक भागवत यांच्यासमवेत केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, काश्मीर केंद्रीय विद्यालयाचे कुलपती लेफ्टनंट जनरल सय्यद अटा हुसेन उपस्थित होते. मुस्लीम समाजातील बुद्धिजीवी व विचारवंतांशी भागवत व अन्य मान्यवरांनी संवाद साधला होता.

देशाची गौरवशाली परंपरा हा एकतेचा आधार आहे, असे सांगत सरसंघचालक भागवत यांनी इस्लाम हा परकीय आक्रमकांबरोबर भारतात आला, हा इतिहास आहे व तो तसाच सांगणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजातील समजूतदार व विचारी नेत्यांनी आततायी व उथळ वक्तव्यांचा विरोध करायला हवा. त्यांना हे काम दीर्घकाळ व प्रयत्नपूर्वक करावे लागेल. ही आपल्या सर्वाची मोठी परीक्षा असून ती बराच काळ द्यावी लागेल, असे म्हटले होते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा गजराजची धम्माल मजा

आंबेनळी घाटरस्त्यावरील वाहतूक आजपासून सुरु