in

मुंबई महापालिकेची वास्तू आता पर्यटनाचे आकर्षण, ‘हेरिटेज वॉक’चे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

लोकशाही न्यूज नेटवर्क
ऐतिहासिक वास्तू असलेली मुंबई महापालिकेची इमारत आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. पर्यटकांना या इमारतीचा ‘हॅरिटेज वॉक’ घेता येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील व परदेशातील पर्यटक ही वास्तू पाहू शकतील.


जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईच्या महापालिकेची इमारत इंग्रजांच्या काळात बांधलेली आहे. गॉथिक शैलीतील बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक वास्तू आहे. येत्या शनिवारपासून हॅरिटेज वॉक उपक्रमाला सुरुवात होईल. चार टप्प्यांत हा उपक्रम असेल. यातून या वास्तूचा आणि मुंबईचा इतिहास तसेच महत्त्व नागरिकांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक इमारत आणि तिच्या भिंतींना गौरवशाली वारसा लाभला आहे. तोच येथील खुर्च्यांना देखील आहे. या खुर्च्यांवर अनेक जण बसले आहे आणि त्यांनी सभागृह गाजवले आहे. याची आठवण करून देण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आतापर्यंत या वास्तूत लोकप्रतिनिधींचा आवाज घुमतो. मात्र, आता ‘हॅरिटेज वॉक’ उपक्रमामुळे इमारतीची वीट आणि वीट नागरिकांशी बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून वास्तूकलेचा अनुभव घेता येईल, तसेच इतिहासात समरस होण्याची संधी मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर, स्वातंत्र्य लढा, चलेजावची चळवळ मुंबईतून सुरू झाली होती. मुंबईबद्दल जगाला आकर्षण राहिले आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या लोकांनाही येथे राहता येते, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
मुंबई कशी घडली, याचा इतिहास लोकांना समजायला हवा. वानखडे स्टेडियम, हायकोर्ट येथेही हॅरिटेज वॉक सुरू करण्याचा मानस असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शफाअत खान, अशोक राणे, श्रीपाल सबनीस यांच्यासह 34 जण शासनाच्या वाङ्मय पुरस्काराचे मानकरी

शेतकरी आंदोलन : तीनही कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आत्महत्या, राकेश टिकैत यांची धमकी