in

राज्यात गुलाब चक्रीवादळामुळे आज, उद्या अतितीव्र पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून, काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २७ आणि २८ सप्टेंबरला राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्य़ांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

रविवारी दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी चंद्रपुरात रेड अॅलर्ट आहे; तर मंगळवारी ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव येथे रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असेल. मात्र, हा जोर मंगळवारी वाढण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि रायगड येथे तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. मुंबईमध्ये तसेच रत्नागिरीमध्येही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.

धुळे, जळगावमध्येही तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे, नाशिक जिल्ह्यांतील घाट परिसर येथे घाट परिसरामध्ये तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी विदर्भातील पावसाचा जोर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. मात्र, उर्वरित विदर्भामध्ये पावसाचा जोर फार नाही. रविवारच्या अंदाजानुसार विदर्भात अगदी मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकेल.

What do you think?

-12 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज ‘भारत बंद’; शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा

इंदौर- दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले; पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत