in

मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा; सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसोबत बैठक घेतली.या बैठकीत किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी,  या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.  जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

मुंबई महापालिका सज्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल.  अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही ते म्हणाले.

हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत केले जाईल असे सांगितले. एनजीओच्या मदतीने स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती ही त्यांनी दिली. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात सॅनिटाझर कंपनीला लागली भीषण आग

IPL 2021चं वेळापत्रक जाहीर.. ‘या’ दिवशी होणार अंतिम सामना