भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 61 जणांना वाचवण्यात यश आले असून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर ही आग मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीतून 61 जणांना बाहेर काढण्यात आले असून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
महापौरांकडून चौकशीचे आदेश
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
Comments
Loading…