लोकशाही न्यूज नेटवर्क | मुंबईतील तीरा कामत या पाच महिन्यांच्या चिमुकलीवरील उपचारासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटुंबाना तसे पत्र दिले आहे. त्यामुळे तीराच्या आईवडिलांना मोठा धीर मिळाला आहे.
तीरा कामत या ५ महिन्यांच्या चिमुकलीला जीन रिप्लेसमेंट उपचाराची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये होती. मात्र इतकी रक्कम उभारणे कामत कुटुंबियांसाठी अवघड असल्याने त्यांनी क्राउड फंडिंगचा पर्याय निवडला. आणि १६ कोटी रुपये गोळा करण्यात आले. मात्र मोठी अडचण होती ती, ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रुपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे कामत कुटुंबीय चिंतेत होते.
तीराच्या पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी राज्य सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली.पंतप्रधान मोदी यांनी ही तातडीची बाब असल्याचे लक्षात घेऊन तसे लगेचच निर्देश दिले. त्यावर वेगाने कार्यवाही झाली आणि आज या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला आहे.
दरम्यान, तीरासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारा सीमा शुल्क राज्य सरकारने आधीच माफ केला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटुंबाना तसे पत्र दिले आहे. हा तीरा व तिच्या पालकांसाठी खूप मोठा आधार आहे.
Comments
Loading…