लोकशाही न्यूज नेटवर्क | डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मिडीयावर अजून एक दणका मिळालेला आहे. तरुणपिढीमध्ये जास्त वापरले जाणाऱ्या स्नॅपचॅट या कंपनीने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे.
“आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे”,असं स्नॅपचॅटच्या प्रवक्त्याने सांगितलं. “त्यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होतं, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली”,अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.
एकाच दिवसापूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही ट्रम्प यांच्या अकाउंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचं म्हटलं. याशिवाय स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनीही ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. तर, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे.