लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील यावल तालुक्यात किनगाव येथे झालेल्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक आणि पपई व्यापाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील किनगाव गावाजवळील अंक्लेश्वर – बुऱ्हाणपूर राज्य मार्गावरून रविवारी मध्यरात्री एक ट्रक पपई घेऊन धुळ्याहून रावेरकडे जात होता. याच दरम्यान हा ट्रक उलटला आणि यात 13 मजुरांसह 2 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात 6 महिलांचा समावेश आहे. या विरोधात ट्रक चालक आणि पपई व्यापारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शेख जहीर शेख बदरूद्दीन असे ट्रकचालकचे नाव असून अमीन शाह अशपाक शाह असे पपई व्यापाऱ्याचे नाव आहे. हे दोघेही रावेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिली आहे.
या अपघाताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केलं आहे. सोमवार सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं. ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केल्या असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारनेही मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Comments
Loading…