राज्यातील कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. आठवडाभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ३१०२७ ने वाढली आहे, तर शुक्रवारी दिवसभरात ६ हजार ११२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजार ७६५ झाली आहे.
गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ६७० इतकी होती. कोरोना रुग्णांच्या संख्येनं गुरुवारी दोन महिन्यांतील उच्चांकी संख्या गाठली होती. ५, ४२७ नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली होती. शुक्रवारी तर त्याहून गंभीर स्थिती राहिली. दिवसभरात ६ हजार ११२ नवे रुग्ण आढळले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता इतर सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Comments
Loading…