मुंबईत करोना रुग्णसंख्येचा पुन्हा स्फोट झाला असताना व मंगळवारीच महापालिकेने होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करणारा आदेश काढला असताना मुंबईत कोविड नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत पुन्हा लॉकडाऊन लावले जाऊ शकते अशीही चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांनी अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी लॉकडाऊन व अन्य बाबतीत पालिकेची भूमिका स्पष्ट केली.
सुरेश काकाणी यांनी मुंबईत लॉकडाऊन होणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. राज्य शासनाने कोविड बाबत जी नवीन नियमावली जारी केलेली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर आमचा भर आहे. या नियमावलीत खासगी व सरकारी कार्यालयांसाठी ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे. नियमांचे पालन झाल्यास गर्दी कमी होईल, असा विश्वास काकाणी यांनी व्यक्त केला.
जुहू चौपाटी व मुंबईतील अन्य चौपाट्या तसेच विविध पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. सोमवारपासून जुहू चौपाटीवर अँटिजेन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. तसंच परिस्थिती गंभीर झाल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, शिवाय पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, अशीही सूचना देण्यात येत आहे, असे काकाणी यांनी नमूद केले.
गर्दी नियंत्रणात येत नसल्याने मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात लोकलमधील गर्दी हेसुद्धा एक कारण आहे. त्याबाबत विचारले असता लोकलवर कोणतेही निर्बंध आणण्याचा विचार नसल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. मुंबईत रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढविण्यावर भर दिला जात आहे. पुढील कालावधीत दिवसाला ५० हजारपेक्षा जास्त तपासण्या करण्याची तयारी केली जात आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 3,512 नवे कोरोना रुग्ण आढळले त्यानंतर आता एकूण 3,69,426 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भाग हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. आठवड्यातील रुग्णवाढीचा दर हा 0.97% आहे.
Comments
Loading…