in

आयुष्याला ‘रिस्टार्ट’ करणारा कोरोना लॉकडाऊन!

Share

रुपल पालांडे |

देशभरात लॉकडाऊन सुरु आहे त्याला साठ पेक्षाहुन जास्त दिवस झाले आहेत. या साठ दिवसांत स्वातंत्र्यांतून बंधनात अडकल्याचा अनेकदा विचार आला पण कानांवर पडणाऱ्या बातम्या आणि बातम्यांवरील दृश्ये काळजाला भिडू लागली आणि भीतीचे सावट पसरलं. कोरोनाच्या बेडयांमध्ये सारे जग अडकले आणि लॉकडाऊनला सुरुवात झाली.

धावणारी घड्याळे… घड्याळयाच्या काट्यांचा पाठलाग करणारे लोक… पळणाऱ्या गाड्या… मिरवणारे मॉल… थिरकनारी सिनेसृष्टी… सगळंच थांबलं जणू सारं गोठून जावं तस्सं! रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे वाढती रोग्यांची संख्या, या साऱ्यामुळे दिवसागणिक मृत्यू अधिक जवळ येतोय की काय असल्याचे भासू लागलं.

एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना दुसरीकडे हातावर पोट असलेला निराधार भुकेने तडफत आहेत. येणारा प्रत्येक दिवस या लॉकडाऊनमध्ये जगण्याची नवीन उमेद घेऊन येतोय तर वाढत्या लॉकडाऊन मधला प्रत्येक दिवस हा गरिबांसाठी जगण्याचा मार्ग अधिक खडतर करतोय.

डोळ्यांतून अश्रू येतील अशा परिस्थितीची दाहक बाजू आज जगाला कळली. जिथे जगण्याची उमेद आहे. रोज जगण्यासाठीचा खडतर प्रयत्न सुरू आहेत, पोटची भूक शमविण्यासाठी स्वीकारलेली लाचारी आहे, रस्त्यांवर पायपीट करणारा मजूर सुरक्षेतेसाठी मैलांचा प्रवास करीत आहे, काम नसल्याने भुकेलेले व्याकूळ डोळे आसरा शोधत आहेत. प्रवास कुटुंबासाठी असो… नाहीतर जगण्यासाठी… पण प्रवासात त्यांची होणारी फरफट पाहून डोळ्यांत आसवे साचतात. एकीकडे सगळे या विचारात आहेत की, हा लॉकडाऊन कधी सपंणार तर या विरुद्ध दिशेला मजूर आहेत जे जगायचं कसं ह्याचा शोध घेतायंत…

लॉकडाऊनमुळे सगळ्यांची जीवनशैली बदलली आहे. धावती आयुष्य स्थिरावली आहेत. सगळं काही सुरळीत असताना मध्येच इंटरनेटचं डेटा संपवा आणि एकच गोष्ट बफरिंग होत राहावी तसंच काहीसं झालंय! पण कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांनाच एक नवा ‘रीस्टार्ट’ मिळाला. नात्यांना नवं वळण मिळालं, स्वतःबद्दल नवा दृष्टिकोन मिळाला, कामतून थोडी विश्रांती मिळाली आणि स्वतःतल्या कलागुणानां वाव मिळाला. थाळीमध्ये नवनवे पदार्थ रोज सजू लागले, कोणी भिंती रंगवल्या, कोणी वादन कला अवगत केली तर कोणाचे पाय पुन्हा थिरकू लागले, लेखनी, कुंचले, रंग, वाद्य, कला, कौशल्य इत्यादी इत्यादी…

सरळेजण घरी राहून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. देशातले वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार तसेच इतर सहायक वर्ग प्रशासनासोबत राहून कोरोनाविरुद्ध युद्धपातळीवर लढत आहेत. लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रियजनांपासून लांब राहून तहानभूक, आराम, झोप कशाचीच तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊन च्या काळात सारी देवस्थाने बंद करण्यात आली आणि दवाखाने सेवेला तत्पर झाले. माणसा मधला माणूस जागा झाला आणि माणसातला देव माणुसकीच्या रक्षणार्थ धावून आला एवढं मात्र नक्की..!

सारं काही लवकरात लवकर ठीक होईललंच….

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास सारे यशस्वी होतील. कारण कोरोना लॉकडाऊन मुळे आपण जगायला तर शिकलो पण नेहमी दुसऱ्यासाठी जगायचं असतं हे कोरोनानं शिकवून दिलं. लॉकडाऊन संपेल तेव्हा संपेल पण सरतेशेवटी एकच सर्वांना सांगणं आहे ते म्हणजे स्वछंदी जगण्यासाठी घरी राहा, नियमित हात स्वच्छ धुवा, बाहेर जाताना मास्क वापरा. कारण हे केलंत तरच हे ही दिवस जातील आणि ‘रिस्टार्ट’ झालेलं आयुष्य जगण्याची नवीन उमेद देऊन जाईल..

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे, एकदा वाचाच..

ॲप ‘आरोग्य सेतू’मधील त्रुटी शोधा; चार लाखांचे बक्षीस मिळवा